आमदार चाबुकस्वारांच्या वाढदिवसाचे बेकायदा फ्लेक्स लावले; शिवसेना व्यापारी सेल शहराध्यक्षावर गुन्हा दाखल

पिंपरी, (पिंपरी चिंचवड टाइम्स) – शिवसेनेचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांच्या वाढदिवसानिमित्त विनापरवानगी फ्लेक्स लावल्याप्रकरणी शिवसेनेचे व्यापारी सेल शहराध्यक्ष किशोर केसवाणी यांच्या विरोधात मालमत्ता विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक हिरानंद ऊर्फ डब्बू किंमतराम आसवानी (वय ५१, रा. पिंपरी कॅम्प) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून शिवसेना व्यापारी सेलचे शहराध्यक्ष किशोर केसवाणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वतःची शिवसेनेच्या व्यापारी सेलच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त किशोर आसवाणी यांनी २९ ऑगस्ट रोजी पिंपरी कॅम्प परिसरात फ्लेक्स लावले होते. त्यासाठी त्यांनी महापालिकेची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 284, 245 आणि मालमत्ता विद्रुपीकरण कायदा कलम 3, 4 अन्वये केसवाणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी पोलिस तपास करत आहेत.

Share this to: