उघड्यावर शौचाला बसले म्हणून दोन दलित मुलांची जमावाकडून मारहाण करत हत्या

शिवपुरी, (पिंपरी चिंचवड टाइम्स) – उघड्यावर शौचाला बसल्याबद्दल दोन दलित मुलांची जमावाने मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस निरीक्षक आर. एस. धाकड यांनी भवेकेडी गावात सकाळच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे सांगितले आहे. पीडित दलित मुलांची ओळख पटली आहे.

१२ वर्षीय रोशनी आणि १० वर्षीय अविनाश पंचायत इमारतीसमोर शौचाला बसले होते. यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली. जमावाने पंचायतीच्या इमारतीसमोर शौचाला बसल्याचा जाब विचारत दोन्ही मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलांना अत्यंत निर्दयीपणे मारहाण करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन्ही मुलांना जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलीस निरीक्षक आर. एस. धाकड यांनी तपास सुरु असून आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती दिली आहे. याआधी जुलै महिन्यात मध्य प्रदेशात ५८ वर्षांच्या व्यक्तीची मोर चोरत असल्याच्या संशयावरुन हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कारवाई करत नऊ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या.

Share this to: