भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून ५० हजार कोरोना लस; नगरसेवक रवि लांडगे यांच्या प्रभागातून लसीकरणाला सुरूवात

पिंपरी, दि. १६ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वतीने भोसरी विधानसभा मतदारसंघातील ५० हजार नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. भोसरी, धावडेवस्ती येथील आनंद बाबा मंगल कार्यालयात या लसीकरण मोहिमेला शनिवारपासून (दि. १६) सुरूवात करण्यात आली. भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेऊन कोरोनाची लस टोचून घ्यावी, असे आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी केले.

यावेळी बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवि लांडगे, नगरसेवक अजित गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते संजय उदावंत, सोनाली उदावंत, राहुल लांडगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भोसरी विधानसभा अध्यक्ष अमित लांडगे आदी उपस्थित होते.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंब प्रतिष्ठानने या लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे.

खासदार कोल्हे म्हणाले, “शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी कोरोना लसीचे पाच लाख डोस उपलब्ध करुन घेतले आहेत. कोरोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून महाविकास आघाडीचे सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. राज्यातील सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी ५० हजार डोसेस देत आहोत.

भोसरी विधानसभा मतदारसंघात आजपासून लसीकरण मोहिम सुरु केली आहे. या मतदारसंघात १६ ते ३० ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम सुरू राहील. लसीकरणासाठी सेंटर तयार केले आहेत. गृहनिर्माण सोसायट्या, झोपडपट्यांमध्ये वाहनांच्या माध्यमातून जाऊन नागरिकांचे लसीकरण केले जाईल. महापालिकेच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी होईल. नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा. रवी लांडगे यांच्या प्रभागातून या उपक्रमाची सुरुवात केली. कै. अंकुशभाऊ लांडगे यांनी विकासकामांची वाट दाखवून दिली. त्या वाटेवर रवीभाऊ लांडगे चालत आहेत. ते समाजासाठी सातत्याने काम करून वेगळा आदर्श निर्माण करत आहे. त्याचा खरोखर मनस्वी आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.”

Share this to: