‘रामायण’ मालिकेत रावणाची भूमिका साकरणारे अरविंद त्रिवेदी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, ८२ व्या वर्षी अखेरचा श्वास

मुंबई, दि.६ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – १९८७ मध्ये दूरदर्शनवर प्रसारित होणारी लोकप्रिय मालिका ‘रामायण’मधील रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचं मंगळवारी रात्री निधन झालं.

वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला. अरविंद त्रिवेदी गेल्या बऱ्याच काळापासून प्रकृतीच्या समस्यांचा सामना करत होते. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.

अरविंद त्रिवेदी यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी एका मराठी न्यूजसोबत फोनवरुन झालेल्या संभाषणात अरंविद त्रिवेदी यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले की, “अरविंद त्रिवेदी गेल्या बऱ्याच काळापासून आजारी होते. गेल्या ३ वर्षांपासून ते शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करत होते. अशातच दोन ते तीन वेळा त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयातही दाखल करावं लागलं होतं. साधारणतः महिन्याभरापूर्वी ते उपचारानंतर घरी परतले होते. मंगळवारी रात्री ९ ते ९.३० दरम्यान त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यामुळं मृत्यू झाला. मुंबईतील कांदिवली येथील घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.” तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, “अरविंद त्रिवेदी यांच्यावर सकाळी ८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.”

रामानंद सागर कृत ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेपासूनच अरविंद त्रिवेदी यांच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. त्यांनी साकारलेली रावणाची भूमिका लोकांच्या मनात इतकी ठसली होती की, त्यांना खऱ्या आयुष्यातही त्यांच्या भूमिकेवरुन ओळखू लागले होते. ‘रामायण’मध्ये काम करण्यापूर्वी गुजरातीत त्यांनी शेकडो नाटकं आणि चित्रपटांमधून अभिनय केला होता. अरविंद त्रिवेदी यांना कल्पना नव्हती की, रामायणातील त्यांची भूमिका इतकी लोकप्रिय होईल.

रामायण मालिकेनंतर अरविंद त्रिवेदी यांनी ‘विक्रम और बेताल’ या हिंदी मालिकेतही काम केलं होतं. याशिवाय त्यांनी टेलिव्हिजन विश्वातील अनेक चित्रपटांमधूनही आपल्या अभिनयानं ठसा उमटवला. मात्र आजही त्यांना रामायण मालिकेत त्यांनी साकारलेल्या रावणाच्या भूमिकेमुळं ओळखलं जातं. त्यांनी ३०० हून अधिक गुजराती आणि हिंदी चित्रपटांमधून काम केलं आणि अनेक गुजराती नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रामायणातील भूमिकेच्या यशानंतर त्यांना भाजपकडून लोकसभा निवडणूकीसाठी तिकीटही देण्यात आलं होतं. त्यांनी गुजरातच्या साबरकांठामधून भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि बहुमतानं विजयी देखील झाले. १९९१ ते १९९६ पर्यंत ते लोकसभेत खासदार होते. दरम्यान, अरविंद त्रिवेदी यांच्या बंधू उपेंद्र त्रिवेदीही गुजराती रंगमंच आणि चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते होते.

Share this to: