तयारी आषाढी वारीची; देहूत महापौरांनी केली रस्ते डांबरीकरण कामांची पाहणी

भोसरी, दि. २१ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त देहूच्या हद्दीत देहु कमान विठ्ठलवाडी मार्ग, तसेच देहू कमान ते झेंडेमळ्यापर्यंत करण्यात येत असलेल्या रस्ते डांबरीकरण कामाची महापौर राहूल जाधव व आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी शुक्रवारी (दि. २१) पाहणी केली.

विठ्ठलवाडी येथे शासनामार्फत (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) सुरु असलेले काम हे पालखी सोहळा दोन दिवसावर आलेला असताना संथ गतीच्या कामाबाबत महापौरांनी नाराजी व्यक्त केली. कामाबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारणी केली. संबंधित काम तातडीने पूर्ण करण्याकामी महापालिकेच्या वतीने संबंधित विभागांना पत्र दिलेले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित पालखी सोहळा बैठकीमध्ये सदर काम तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधित विभागाला सूचना दिलेल्या होत्या. तरीही काम पूर्ण झालेले नाही. याबाबत संबंधित ठेकेदाराला दोन दिवसात काम पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.

यावेळी सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, उपअभियंता संजय काशीद, रोहिदास गाडे, बाळासाहेब काळोखे, नवनाथ टिळेकर, संभाजी घारे आदी उपस्थित होते.

Share this to: