रावेतमध्ये आजारी पत्नीचे हाल न बघवल्याने तिचा खून करून पतीचीही आत्महत्या

चिंचवड, दि. २८ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पत्नीचे आजारपण आणि तिला होणाऱ्या वेदना न बघवल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून खून केला. त्यानंतर पतीने स्वतःच्या हाताची नस कापत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रावेतमध्ये घडली आहे.

वृषाली गणेश लाटे (वय ४०) आणि गणेश ऊर्फ संजय लाटे (वय ४५, रा. शिंदेवस्ती, रावेत) असे मयत पती पत्नीची नावे आहेत. दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली असून यात वृषालीची सध्याची अवस्था बघवत नसून तिच्यावर अतोनात प्रेम आहे. त्यामुळे हे पाऊल उचलत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत वृषाली यांना आजार होता. त्यांना खूप वेदना व्हायच्या. त्यांच्या वेदना मयत पती संजय यांना बघवत नव्हत्या. घरात ते दोघेच असायचे. त्यांना मुलबाळ नव्हते. संजय हे एका नामांकित कंपनीत कामाला होते. मंगळवारी देखील पत्नी वृषाली यांना खूप वेदना होत होत्या. त्यावेळी वेदना बघवत नसल्याने संजय यांनी मध्यरात्री वृषालीच्या डोक्यात हातोडा मारून गंभीर जखमी करून खून केला. त्यानंतर स्वतःदेखील हाताची नस कापत गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांचा दरवाजा उघडा नसल्याने शेजारील व्यक्तींनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. सोसायटीमधील व्यक्तींनी गणेशोत्सव साजरा करावा आणि एकही कार्यक्रम रद्द करू नये, हीच माझी अंतिम इच्छा असल्याचे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत नमूद केले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे हे करत आहेत.

Share this to: