दिग्दर्शक वारंवार हॉटेलमध्ये बोलवत होता; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

मुंबई, दि. २७ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – ‘#MeToo’ चळवळीनंतर हॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी चित्रपट मिळवण्यासाठी लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागल्याची जाहीर कबुली देण्यास सुरुवात केली होती. हार्वे वेस्टिनसारखे अनेक शोषण करणारे निर्माते जगभरातील चित्रपटसृष्टीत आहेत. ‘कास्टिंग काऊच’चा प्रकार आजही सर्रास सुरू आहे हे आजवर दबल्या आवाजात पुटपुटणाऱ्या तोंडातून बाहेर पडले. त्याचे पडसाद बॉलिवूडमध्येही उमटले नसते तर नवलच! ‘परिणीती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री विद्या बालन हिने तिला आलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला. ‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तिने करिअरच्या सुरुवातीला आलेल्या या अनुभवाबद्दल सांगितले.

मी चेन्नईला एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी गेली होती. त्यावेळी तिथल्या एका दिग्दर्शकाने मला भेटायची इच्छा व्यक्त केली. त्यांना एका चित्रपटाबद्दल माझ्याशी बोलायचे होते. तर मी त्यांना म्हटले की कॉफी शॉपमध्ये बसून आपण बोलूया. मात्र त्यांनी वारंवार मला हॉटेलच्या रुममध्ये जाऊन बोलूयात असा आग्रह केला. त्यानंतर आम्ही माझ्या हॉटेलच्या रुममध्ये गेलो आणि मी रुमचा दरवाजा उघडाच ठेवला. पाच मिनिटांत ते तिथून निघून गेले, असे ती म्हणाली.

विद्या बालन तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. अभिनय कौशल्याच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र तिचा हा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीला तिला तिच्या कपड्यांवरूनही अनेकदा टोमणे मारले जायचे. मात्र आता त्या प्रतिक्रियांचा काही फरक पडत नसल्याचे ती सांगते. ”तुम्ही सगळ्यांना खूश करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जसे आहात तसेच राहा,” असा सल्ला तिने चाहत्यांना दिला.

Share this to: