पिंपरी-चिंचवडमधील शिवसेना नेते इरफान सय्यद यांनी बकरी ईदचा खर्च टाळून पूरग्रस्तांना केली एक लाखांची मदत

पिंपरी, दि. १३ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – शिवसेना नेते व कामगार नेते इरफान सय्यद यांनी बकरी ईद सणावर केला जाणारा खर्च सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना दिला आहे. त्यांनी एक लाख रुपयांचा धनादेश युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे पूरग्रस्तांसाठी दिला आहे

इरफान सय्यद यांनी या सामाजिक दातृत्वाने मुस्लिम बांधवापुढे नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केलेला एक लाख रुपयांचा धनादेश शिवसेनेकडून पूरग्रस्तांना दिला जाणार आहे. धनादेश घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी इरफान सय्यद यांच्या समाजकार्याचे कौतुक केले. राज्यावर अस्मानी संकट आले असताना शिवसेनेचे मावळे लोकांच्यासाठी एका पायावर उभे राहून मदतीसाठी तत्पर असतात, हे इरफान सय्यद यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. शिवसेनेला अशा मावळ्यांचीच गरज आहे. त्यासाठी त्यांना पक्षाकडून हवी ती ताकद दिली जाईल, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले याबाबत इरफान सय्यद म्हणाले, “कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागाला महापुराचा मोठा फटका बसला. महापुरामुळे अनेकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशावेळी प्रत्येकाने पुढे येऊन आपल्या क्षमतेनुसार नुकसान झालेल्या आपल्याच बांधवांना मदत केली पाहिजे. महाराष्ट्र मजदूर संघटना व कामगारांच्या वतीनेही पूरग्रस्तांना याआधीच जीवनावश्यक वस्तू तसेच आरोग्य पथक पाठविण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील गणेशोत्सव मंडळांनीही सजावटीवर होणाऱ्या खर्चात कपात करुन ती रक्कम पूरग्रस्तांपर्यंत पोहचविली पाहिजे. या मदतीच्या आधारे पूरग्रस्त नागिरकांना आपला संसार पुन्हा थाटण्यासाठी नक्कीच आधार मिळेल.”        

Share this to: