भाजप प्रवेश देणे आहे, भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती; पुण्यात पोस्टरबाजीतून टोलेबाजी

पुणे, दि. २९ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – भाजप आणि शिवसेनेत काँग्रेस-राष्ट्रवादीतून सध्या जोरदार इनकमिंग सुरु आहे. यावरुन पुण्यात पोस्टर लावत टोलेबाजी करण्यात आली आहे. अनोळखी व्यक्तीकडून हे पोस्टर लावण्यात आले असून नोकरीची जाहिरात असल्याप्रमाणे भाजप प्रवेश देणे आहे असा उल्लेख या पोस्टरवर करण्यात आला आहे. इतकेच नाही तर यासोबत नियम व अटीही देण्यात आल्या आहेत. ईडी व इन्कम टॅक्स नोटीस आलेल्यांना प्राधान्य, भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती आणि सहकार क्षेत्र बुडवल्याचा अनुभव अशा प्रमुख अटी असल्याचा उल्लेख करून पोस्टरमध्ये भाजपची खिल्ली उडवण्यात आली आहे.

या पोस्टरमध्ये तळटीपही देण्यात आली आहे. विचारधारेची कुठलीही अट नाही असे सांगताना आमच्याकडील जागा फुल झाल्यास मित्रशाखेत अॅडजस्ट करता येईल असा टोला लगावण्यात आला आहे. कारण भाजपसोबत शिवसेनेतही काही नेत्यांनी प्रवेश केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना फोडण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआय या संस्थांचा वापर केला जात आहे. राज्यातील भाजपच्या काही प्रमुख नेत्यांनी या कामासाठी स्वत:ला वाहून घेतले असून, राष्ट्रवादीच्या नेत्यांना धमकावून त्यांना पक्षांतर करण्यास भाग पाडण्यात येत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात केला. राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे, संग्राम जगताप, दिलीप सोपल यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू असली तरी ते पक्ष सोडणार नाहीत, असेही पवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या आरोपाला उत्तर देताना दबाव टाकून लोकं घेण्याची भाजपला गरज नाही असे सांगत शरद पवारांनी आत्मचिंतन करावे असे म्हटले होते. भाजपमध्ये येण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक स्वत: इच्छुक आहेत. त्यांना फोन करण्याची आणि दबाव टाकून घेण्याची भाजपला काहीच गरज नाही. मोजक्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

Share this to: