निगडी परिसरातील धोकादायक झाडांची छाटणी करावी; मनसे शहराध्यक्षांची आयुक्तांकडे मागणी

भोसरी, दि. २९ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निगडी परिसरात मुख्य रस्त्यावर एक झाड पडले. झाडे पडण्याच्या घटनांमुळे शहरात वाहतूक कोंडीच्या घटना घडल्या. त्यामुळे निगडी परिसरातील धोकादायक वृक्षांची छाटणी करण्यात यावी,अशी मागणी पिंपरी-चिंचवड मनसेचे शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात चिखले यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “प्रभाग क्रमांक १३ निगडी, यमुनानगरमधील महाराणा प्रताप पुतळा ते दुर्गानगर चौकापर्यंत ४० ते ४५ वर्षांपूर्वी ग्रीन-ट्रीची झाडे लावण्यात आलेली होती. आजच्या सद्यःस्थितीला ही झाडे अत्यंत मोठी झालेली आहेत. याच झाडांच्या बुंद्याच्या शेजारुन महापालिकेकडून अमृत योजनेअंतर्गत मोठी ड्रेनेजलाईन टाकण्यात आलेली होती. यामध्ये या झाडांच्या मुळ्या मोठ्या प्रमाणात तुटल्या गेलेल्या आहेत. झाडे अक्षरक्ष: एका बाजूने वाकली गेली आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने निगडी परिसरात एक मोठे  ग्रीन-ट्रीचे झाड सकाळी रस्त्याच्या मधोमध कोसळले. झाडपडीच्या या घटनेमुळे वाहतूककोंडी झाली. महापालिका प्रशासन, वाहतूक पोलिस आणि फायर ब्रिगेडच्या जवानांनी रस्त्यावर पडलेली झाडे शक्य तितक्या लवकर बाजुला करत वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. निगडी परिसरात असे अजूनही अनेक झाडे आहेत की, ते सद्य परिस्थितीमध्ये कोसळू शकतात. त्यामुळे आपण लवकरात लवकर अशा झाडांची पाहणी करणेसाठी समिती नेमावी. शहरातील सर्व धोकादायक झाडे १५ फुटांपर्यंत छाटण्यात यावीत, अशी मागणी चिखले यांनी केली आहे.”

Share this to: