पतीच्या चौकशीमुळे घाबरलेल्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला – शरद पवार

पुणे, दि. २८ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेल्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांची एका लाच प्रकरणात चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्या घाबरल्या होत्या. त्या मला भेटल्या आणि बचावासाठी पक्ष सोडून जात असल्याचे त्यांनी मला सांगितले. त्यानंतर  त्यांनी राष्ट्रवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आम्ही त्यांना काहीही मदत करू शकत नव्हतो, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शरद पवार म्हणाले, “आमदार मधुकर पिचड यांनी यापूर्वीही राष्ट्रवादीत काम केले आहे. त्यांना विकासकामे करताना त्रास झाल्याचे माहिती नव्हते. विकासकामे न झाल्याचा त्यांना त्रास होत असल्याने ते राष्ट्रवादी सोडत असावेत. सातारचे आमदार शिवेंद्रराजे काल मला भेटले. त्यांनी मी पक्षाच्या चौकटीबाहेर नसल्याचे मला सांगितले आहे. श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप आणि नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी मला फोन केले होते. त्या दोघांनीही पक्षासोबत असल्याचे मला सांगितले आहे. बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे काल माझ्यासोबत पुस्तक प्रकाशन सोहळ्यात होते. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे हे मला भेटायला येणार आहेत.

राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना पक्ष सोडण्यासाठी दबाव टाकला जात आहे. अडचणीत सापडलेल्या मोठ्या नेत्यांच्या सहकारी संस्थांना मदत करण्याच्या नावाखाली भाजपमध्ये येण्यासाठी किंवा निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण नाकारल्यामुळे त्यांच्या घरावर ईडीचा छापा पडला, असा आरोपही पवार यांनी केला.”

Share this to: