जबलपूरमधील ८१ वर्षीय महिलेने २८ वर्षांपासून अन्नग्रहण केले नाही; अयोध्येत राम मंदिर होण्यासाठी करत आहेत उपवास

जबलपूर, दि. २ (पिंपरी-चिंचवड टाइम्स) – अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू होताच मध्य प्रदेशच्या जबलपूर येथील ८१ वर्षीय महिलेची तपस्या पूर्ण होणार आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत वादग्रस्त रचना पाडल्यानंतर दंगल झाली होती. त्यानंतर या महिलेने प्रतिज्ञा घेतली की, राम मंदिराचे भूमिपूजन होईपर्यंत अन्न घेणार नाही. तेव्हापासून त्या फलाहारासोबत राम नावाचा जप करत उपवास करत आहेत.

जबलपूरच्या विजयनगर येथील उर्मिला देवी यांनी उपवास सुरू केला तेव्हा त्या ५३ वर्षांच्या होत्या. सुरुवातीला लोकांनी तिला उपवास मोडावा म्हणून खूप काही सांगितले. पण त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. मंदिराच्या बाजूने निकाल येताच त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी निकाल देणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या होत्या.

५ ऑगस्ट रोजी अन्न घेणार की नाही, अद्याप निश्चित नाही

अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराची पायाभरणी केली जाईल. उर्मिला या दिवशी दिवसभर रामनामाचा जप करणार आहेत. अयोध्येत जाऊन रामलल्लाच्या दर्शनानंतर अन्न ग्रहण करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांचे कुटुंब हे सांगत आहे की कोरोनामुळे केवळ निमंत्रित लोक अयोध्या कार्यक्रमात जाऊ शकतात. अशा परिस्थितीत त्यांनी घरी उपवास सोडावा, परंतु त्यांनी अद्याप त्यास सहमती दर्शवली नाही.

उर्वरित आयुष्य अयोध्येत घालवण्याची इच्छा

उर्मिला म्हणतात की अयोध्येत राम मंदिर बांधणे त्यांच्यासाठी पुनर्जन्मासारखे आहे. त्या म्हणतात की हा संकल्प पूर्ण झाला आहे. आता तिला फक्त अयोध्येत थोडीशी जागा मिळावी अशी इच्छा आहे जेणेकरुन ती आपले उर्वरित आयुष्य तिथे घालवू शकेल.

Share this to: