धक्कादायक; पुण्यात हडपसरमधील रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित महिलेचा वॉर्डबॉयकडून विनयभंग

पुणे, दि. १ (पिंपरी-चिंचवड टाइम्स) – पुण्यात सिंहगड रोडवरील कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना ताजी असताना आता हडपसरमध्ये सह्याद्री रुग्णालयातील कोरोनाबाधित महिलेचा वॉर्डबॉयकडून विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. यामुळे रुग्णालयातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अशोक नामदेव गवळी (वय ४०, रा. वडगावशेरी) या वॉर्डबॉयला अटक करण्यात आली आहे. हडपसर भागातील सह्याद्री रूग्णालयात तो सेवेत असून याच रुग्णालयात एक ३५ वर्षीय महिला कोरोनावर उपचार घेत आहे. ही महिला एका खोलीमध्ये काल सायंकाळच्या सुमारास आराम करीत होती. तेव्हा रुग्णालयातील वॉर्डबॉय अशोक गवळी त्या महिलेच्या खोलीत जाऊन, तिच्या चेहर्‍यावरील मास्क काढून तुम्ही मला ओळखता का? असं विचारत लज्जास्पद कृत्य केले.

तेवढ्यात रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याने हा प्रकार पाहिला आणि आरोपीला हटकले. त्यामुळे आरोपी तेथून पळून गेला आणि त्या खोलीतील घडलेला सर्व प्रकार प्रत्यक्षदर्शी महिलेने रुग्णालय प्रशासनाला त्वरित कळवला. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, पीडित महिला घाबरून गेली होती. तिच्याशी रुग्णालय प्रशासनाने सर्व माहिती जाणून घेतली. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास रूग्णालयामधील कर्मचारी आले. त्यानंतर घटनास्थळी पीडित महिलेच्या खोलीची महिला पोलीस कर्मचार्‍यांनी पीपीई किट घालून पाहणी केली. त्यानंतर महिलेचा जबाब नोंदवून घेतला आणि आरोपीला अटक करण्यात आली. तसेच आरोपीची कोरोना तपासणी देखील करण्यात आली असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे हडपसर पोलिसांकडून सांगण्यात आले.

Share this to: