कोरोनाच्या भितीने “या” देशातील नागरिकांनी २.२५ ट्रिलियन नोटा जाळल्या

सेऊल, दि. १ (पिंपरी-चिंचवड टाइम्स) – करोनाच्या संसर्गामुळे जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे अनेकजण भीतीच्या वातावरणात वावरत आहेत. दक्षिण कोरियाच्या नागरिकांनी करोनाची जरा अधिकच भीती बाळगली की काय अशी शंका निर्माण झाली आहे. दक्षिण कोरियातील नागरिकांनी करोनाच्या भीतीपोटी २.२५ ट्रिलियन डॉलर्स किंमतीच्या नोटा, नाणी नष्ट केल्या अथवा त्यांचे नुकसान केले असल्याचे समोर आले आहे.

करोनाच्या भीतीमुळे दक्षिण कोरियाच्या नागरिकांनी चलनी नोटा वॉशिंग मशिनमध्ये धुतल्यामुळे नोटा खराब झाल्या. तर, काहीजणांनी करोनाचा विषाणू नष्ट करण्यासाठी नोटा ओवनमध्ये ठेवून गरम केल्या. मात्र, या नोटा बऱ्याच प्रमाणात जळाल्या. दक्षिण कोरियाच्या रिझर्व्ह बँकेकडे आता या खराब झालेल्या नोटांचा खच पडला असून याचे मूल्य ट्रिलियन डॉलरच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ दक्षिण कोरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ कोरियाने म्हटले आहे की, गेल्या सहा महिन्यांत लोकांनी २०१९ च्या तुलनेत तीनपट जास्त जळालेल्या नोटा बदलल्या आहेत. जानेवारी ते जून या कालावधीत १.३२ अब्ज वॅन (१.१ अब्ज डॉलर्स) जळालेल्या नोटा बँकेत परत आल्या आहेत. यामागे करोनाची भीती असल्याचे प्रमुख कारण आहे.

यावर्षी ओवनमध्ये चलनी नोटा जळाल्याच्या अनेक घटना घडल्या असल्याचे बँकेने म्हटले आहे. चलनी नोटांमधून करोना विषाणूचा प्रसार होण्याच्या भीतीने लोकांनी ओवनमध्ये या नोटा, नाणी ठेवल्या होत्या. २०२० च्या पहिल्या सहा महिन्यांत एकूण २.२ ट्रिलियन डॉलर्सच्या फाटलेल्या आणि जळालेल्या नोटा-नाणी बँकेकडे जमा करण्यात आल्या आहेत.

मायक्रोओव्हनशिवाय या चलनी नोटा आणि नाणी करोनारहित करण्यासाठी वॉशिंग मशीनचा देखील वापर करण्यात आला आहे. उम नावाच्या एका व्यक्तीनं ३० हजार डॉलर्सच्या नोटा बदलल्या. या नोटा त्यानं वॉशिंग मशिनमध्ये धुतल्याने या नोटा फाटल्या. पण यामुळे त्याचं नुकसान देखील झाले. जवळपास त्याच्या मूळ रक्कमेपैकी ३५ टक्के रक्कम नष्ट झाली. कुटुंबातील सदस्यांकडून ही रक्कम त्याला मदत म्हणून मिळाली होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याचे नुकसान झाल्यामुळे त्याच्या चिंतेत वाढ झाली.

करोनाचा संसर्ग फैलावल्यानंतर चीननेदेखील बहुतांशी नोटा बदलून नवीन नोटा वितरीत केल्या होत्या. मात्र, कोरियन नागरिकांनी भीतीपोटी केलेल्या वर्तवणुकीमुळे त्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे.

Share this to: