पुणेकरांना मोठा दिलासा; रात्रीची संचारबंदी हटविली, आता पुणेकरांना रात्रीही फिरता येणार

पुणे, दि. १ (पिंपरी-चिंचवड टाइम्स) – करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे शहरात रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत असलेली संचारबंदी अखेर मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून असलेली संचारबंदी कमी झाल्याने नागरिकांना रात्रीही फिरता येणार आहे. पुणेकरांसाठी हा खूप मोठा दिलासा आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर २४ मार्चनंतर लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. पूर्ण राज्यात २४ तास संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर एक जून पासून दिवसा असलेली संचारबंदी कमी करून फक्त रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी ठेवण्यात आली होती. रात्री संचारास प्रतिबंध घालण्यात आला होता. आता शासनाने एक ऑगस्टपासून संचारबंदीचा कोणताही आदेश काढलेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. पण, रात्रीची संचारबंदी शासनाने मागे घेतल्यामुळे आदेश काढण्यात आला नसल्याचे समोर आले आहे. तरीही नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये. आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

याबाबत पुणे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम म्हणाले, “शहरात रात्री असलेली संचारबंदी मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे कोणताही आदेश काढण्यात आलेला नाही. शहरात आता कोणत्याही प्रकारची संचारबंदी नाही.”

Share this to: