पिंपरी-चिंचवडमधील बाल कलाकाराचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश; महापौर माई ढोरे यांनी घरी जाऊन केले कौतुक

पिंपरी, दि. ३१ (पिंपरी-चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवडमधील बाल कलाकार अनया अतुल फाटक हिने दहावीच्या परीक्षेत ९७.४० टक्के गुण मिळविले आहे. त्यामुळे महापौर माई ढोरे यांनी अनयाच्या घरी जाऊन तिला पेढा भरवत तिचे कौतुक केले.

अनया निगडी येथील डी. आय. सी. इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थीनी आहे. तिने दहावीच्या परीक्षेत ९७.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. अनयाने “वेगळी वाट” या मराठी चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केले आहे. या चित्रपटात तिने विदर्भातील एका शेतकऱ्याच्या मुलीची भूमिका केली होती. हा चित्रपट एका शेतकऱ्याच्या मुलीवरच आधारीत होता. गरीब परिस्थितीवर मात करून शिक्षण कसे पूर्ण करावे असा संदेश या चित्रपटातून दिलेला होता. अभिनयाबरोबरच ती भरतनाट्यममध्ये विषारद आहे.

शहरातील एका बाल कलाकाराने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याचे समजल्यानंतर महापौर माई ढोरे शुक्रवारी अनयाच्या घरी गेल्या. तिच्या घरी जाऊन महापौरांनी तिचे कौतुक केले. यावेळी अनयाचा आईवडील उपस्थित होते. महापौर ढोरे यांनी अनयाला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Share this to: