निधनाच्या एक दिवस आधी राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांचा कोरोना चाचणी अहवाल आला होता निगेटिव्ह

पिंपरी, दि. ३१ (पिंपरी-चिंचवड टाइम्स) – निधनाच्या एक दिवस आधी राष्ट्रवादीचे दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले होते, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे.

आकुर्डी प्रभागाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद रमजान शेख (वय ५९) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल १५ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना आकुर्डीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

तेथे उपचार सुरू असताना त्यांची काल म्हणजे ३० जुलै रोजी पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता, असे महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले. कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. दरम्यान, महापौर माई ढोरे आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नगरसेवक जावेद शेख यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

Share this to: