आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावाचा सतत जप करून मोठे होणे तेरे बस की बात नही; माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांचा शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्यावर जोरदार पलटवार

पिंपरी, दि. ३१ (पिंपरी-चिंचवड टाइम्स) – शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी स्वतःचा आणि बिल्डरांचा फायदा व्हावा म्हणून दादागिरी आणि दहशतीच्या बळावर वाकडमधील अनेक रस्त्यांची कामे अडविली आहेत. त्यांच्याच कुटुंबातील सदस्य असलेल्या एका ज्येष्ठ शिवसैनिकाने काही दिवसांपूर्वी पत्रकारांसमोरच कलाटे यांचा पर्दाफाश केलेला आहे. वाकडमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून सोसायट्यांना स्वतःच्याच नातलगांच्या टँकरचे पाणी घेण्यास भाग पाडणारे राहुल कलाटे यांनी टँकरमाफिया बनून वाकडमधील सर्वसामान्यांना प्रचंड त्रास दिलेला आहे. त्यांनी पैशांसाठी महापालिकेत एका पदाधिकाऱ्याला जबर मारहाण केली. त्या कलाटे यांनी वाकडमधील विकासकामे भाजपने अडविल्याचे बोंबाबोंब करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा घणाघात माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी केला आहे. तसेच ऊठसूठ आमदार लक्ष्मण जगताप यांचे नाव घेऊन राजकारणात मोठे होणे हे राहुल कलाटे यांच्या बस की बात नही, असा डायलॉग मारत राहुल कलाटे यांच्यावर पलटवार केला आहे.

यासंदर्भात माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “वाकड-पिंपळेनिलख प्रभागाच्या भाजप नगरसेविका ममता गायकवाड या स्थायी समिती सभापती असताना स्वतःच्या प्रभागांसह शेजारच्या प्रभाग क्रमांक २५, वाकड-पुनावळे-ताथवडेमध्ये ३०० कोटींहून अधिक रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देऊन ती कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे वाकडचा कायापालट झाला आहे. वाकडमध्ये रस्ते, फूटपाथ, पथदिवे, विद्युत, स्थापत्य आणि विकासाची अनेक कामे सुरू आहेत. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्या घरात गेल्या ३० वर्षांपासून नगरसेवकपद आहे. भाजपने अवघ्या एक वर्षात वाकडच्या विकासासाठी जेवढा निधी मंजूर केला, त्यातील निम्मा निधी सुद्धा राहुल कलाटे यांना गेल्या ३० वर्षांत आणता आलेले नाही. ३० वर्षे फक्त मिरवण्याचे काम करणाऱ्या राहुल कलाटे यांनी भाजपने वाकडमधील विकासकामे अडविली आहेत, असे म्हणणे म्हणजे मोठा विनोदच आहे. विकासकामांवर बोलणाऱ्या राहुल कलाटे यांनी वाकडमधील स्वतःच्या घरासमोरील रस्ता तसेच येथील अन्य काही रस्त्यांची कामे कित्येक वर्षांपासून अडवून ठेवली आहेत. स्वतःच्या आणि बिल्डरांच्या फायद्यासाठी सर्वसामान्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने त्यांनी हे केले आहे. त्यांच्याच कुटुंबातील सदस्य असलेल्या तारामण कलाटे यांनी राहुल कलाटे यांच्या या बिल्डरधार्जिण्या कारभाराचा पत्रकारांसमोर पर्दाफाश केलेला आहे. तारामण कलाटे हे स्वतः ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. स्वतःच्याच पक्षातील एका ज्येष्ठ शिवसैनिकाला हक्काच्या रस्त्यांसाठी राहुल कलाटे यांनी किती त्रास दिलेला आहे, हे त्यांनी जाहीरपणे सांगितलेले आहे.

एकटे तारामण कलाटेच नाहीत तर वाकडमधील अनेक सामान्यांना राहुल कलाटे यांनी प्रचंड त्रास दिलेला आहे. या भागात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून गृहनिर्माण सोसायट्यांना स्वतःच्याच नातलगांच्या टँकरचे पाणी घेण्यास ते भाग पाडतात. पाणी न घेतल्यास टँकरमाफिया असलेल्या राहुल कलाटे यांच्याकडून होणारी शिवीगाळ, धमकावणे, हातपाय तोडण्याची भाषा यांमुळे सोसायट्यांमध्ये राहणारे नागरिक प्रचंड वैतागले आहेत. वाकड भागात छोटे-मोठे कोणेतही काम सुरू झाले की ठेकेदार, अधिकारी आणि काम करणारे कामगार यांना धमकावून अडवणूक केली जाते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ ही तर नित्याचीच बाब झाली आहे. येथील लक्ष्मीदीप सोसायटीतील नागरिकांनी माझ्याकडे न येता पथदिवे सुरू करून घेतले म्हणून राहुल कलाटे यांनी चक्क पथदिवे बंद करून टाकले होते. हे पथदिवे सुरू करणाऱ्या अधिकाऱ्याला धमकी देऊन शिवीगाळ केली. प्रिस्तीन प्रोलाईफ सोसायटीमधील नागरिकांनी माझी मदत घेऊन सोसायटीच्या पाण्याचा प्रश्न सोडविला म्हणून राहुल कलाटे तेथील नागरिकांना पाणी मिळू नये म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत. राहुल कलाटे यांच्या एका नातलगाने एका सोसायटीसमोर अनधिकृत शेड उभारले होते. सोसायटीतील नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने ते अनधिकृत शेड काढून टाकले. त्यानंतर राहुल कलाटे यांनी त्या अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि दमबाजी केली. आयुक्तांवर दबाव आणून अनधिकृत शेड काढलेल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची चौकशी लावण्यास भाग पाडले. यावरून राहुल कलाटे हे कशा विकृत मानसिकतेतून राजकारण करतात, हे स्पष्ट होते.

राहुल कलाटे यांनी नुकतेच महापालिकेत पैशांसाठी एका पदाधिकाऱ्याला जबर मारहाण केली. वाकडमधील सर्वसामान्य नागरिकांना देखील दमदाटी व धमकाविण्याचे प्रकार सर्रासपणे रोज सुरू आहेत. यामागे कोण नगरसेवक आहे हे या भागातील जनतेला चांगलेच माहित आहे. राहुल कलाटे यांच्याबाबत वाकडमधील नागरिकांच्या मनात प्रचंड सूडभावना निर्माण झालेली आहे. नागरिक हाणामारी, दमदाटी, शिवीगाळ करून नव्हे तर मतपेटीतून आपला सूड घेत असतात. अति तेथे माती होत असते. सूडभावनेने पेटलेला वाकडमधील प्रत्येक नागरिक येत्या महापालिका निवडणुकीत राहुल कलाटे यांचा सूड घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. तोपर्यंत राहुल कलाटे यांना झोप लागणार नाही, असा जोरदार धक्का आमदार लक्ष्मण जगताप यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेलाच आहे. या धक्क्याचा राहुल कलाटे यांनी एवढा जबरदस्त धसका घेतलेला आहे की, ते सतत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावाचाच जप करत असतात. पण आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावाचा जप करून राजकारणात मोठे होणे हे राहुल कलाटे यांच्या बस की बात नही, असा डायलॉग म्हणत गायकवाड यांनी जबरदस्त पलटवार केला आहे.”

Share this to: