चांगली बातमी; देशात दोन कोरोनाविरोधी लसींची चाचणी, त्याचे परिणामही आलेत सकारात्मक

नवी दिल्ली, दि. ३० (पिंपरी चिंचवड टाइम्स) – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशवासीयांसाठी चांगली बातमी दिली आहे. देशात कोरोनावर एकूण दोन स्वदेशी लसींची चाचणी घेण्यात येत असून या चाचण्याचे सकारात्मक परिणाम समोर येत आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. आज पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. जेव्हा केव्हा कोरोनावरील लस विकसीत होईल, त्यामध्ये भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशातील लसीच्या उपलब्धतेसाठी जागतिक आरोग्य संघटनेव्यतिरिक्त विविध देशांकडूनही व्यक्तीगत स्वरुपात भारताशी संपर्क केला जात असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर सकात्मक असल्याचे भूषण यांनी म्हटले आहे. एप्रिल महिन्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ७.८५ टक्के इतका होता. आज मात्र हा दर ६४.४ टक्के इतका झाला आहे. देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी १० लाखांहून अधिक लोकांनी कोरोनावर मात केली आहे. यात डॉक्टर्स आणि परिचारिकांचे महत्वाचे योगदान आहे, असे भूषण म्हणाले.

देशभरातील एकूण १६ राज्यांमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर हा सरासरीपेक्षा अधिक आहे. या राज्यांमध्ये दिल्लीचा रुग्ण बरे होण्याचा दर ८८ टक्के, लडाखचा दर ८० टक्के, हरयाणाचा दर ७८ टक्के, आसामचा दर ७६ टक्के, तामिळनाडूचा आणि गुजरातचा दर ७३ टक्के, राजस्थानचा दर ७० टक्के, मध्य प्रदेशचा दर ६९ टक्के आणि गोव्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ६८ टक्के इतका असल्याची माहिती राजेश भूषण यांनी दिली.

दरम्यान, देशभरात गेल्या २४ तासात कोरोनाचे ५२,१२३ रुग्ण वाढले. याबरोबरच २४ तासांत एकूण ७७५ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५,८३,७९२ वर पोहोचली आहे. संपूर्ण देशात एकूण सक्रिय (ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे) रुग्णांची संख्या ५,२८,२४२ इतकी आहे. यात दिलासा देणारी बाब म्हणजे देशातील एकूण रुग्णांपैकी १०,२०,५८२ रुग्ण बरे झाले आहेत. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांपैकी आतापर्यंत एकूण ३४,९६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Share this to: