पिंपरी-चिंचवड मनसेची मोहननगर येथील कोविड केअर सेंटरला धडक; रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा सुधारण्यासाठी दिला निर्वाणीचा इशारा

पिंपरी, दि. ३० (पिंपरी चिंचवड टाइम्स) – चिंचवड, मोहननगर येथील ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या जेवणात माशा आणि अळ्या आढळून आल्याने पिंपरी-चिंचवड मनसेने गुरूवारी (दि. ३०) या हॉस्पिटलमध्ये धडक देत पाहणी केली. तेथील डॉक्टर व अधिकाऱ्यांना फैलावर घेत चांगलीच कानउघाडणी केली. तसेच जेवणाचा दर्जा सुधारण्यासाठी निर्वाणीचा इशारा दिला.

याबाबत मनसेचे शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले म्हणाले, “कोरोना रुग्णांवर महापालिकेसह खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. त्यावर महापालिका लाखो रुपयांचा खर्च करत आहे. परंतु, प्रत्यक्षात रुग्णांना मात्र योग्य ती सेवा मिळत नाही. महापालिकेने काही रुग्णालये कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी निवडलेली आहेत. त्यातीलच एक मोहननगर ईएसआयसी हॉस्पिटल आहे. या रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा निकृष्ट आहे. या हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या जेवणात माश्या व आळ्या आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा तात्काळ सुधारण्यात यावा. अन्यथा जेवणाचा त्याग करण्यात येईल, असा इशारा कोरोनाग्रस्त रुग्णांनी या रुग्णालयास दिलेला असताना देखील रुग्णालय प्रशासन ताळ्यावर येत नाही. हे अन्नपदार्थ खाल्याने येथील रुग्णांना पोटदुखी, ॲसिडिटी, जुलाब यांसारखे त्रास होत आहेत. वारंवार सांगूनसुद्धा निकृष्ट जेवण पुरवण्यात येत असेल तर, संबंधित अधिकाऱ्यावर व ठेकेदारावर त्वरीत कारवाई करण्यास प्रशासनाचे हात धजावतात नाहीत का? प्रशासनाने वेळीच यावर रोख लावावा व कोरोना रुग्णांना चांगल्या दर्जाचे जेवण पुरवण्याची व्यवस्था करावी. यापुढे देखील शहर मनसेचे शिष्टमंडळ शहरातील प्रत्येक कोविड केअर सेंटरला भेटी देणार आहे. कर्तव्यात कुसूर होत असल्याचे दिसल्यास मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा सचिन चिखले यांनी दिला आहे.

यावेळी राजू सावळे, बाळा दानवले, मयूर चिंचवडे, दत्ता देवतरासे, मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Share this to: