चिंचवडमधील एका मुलीने आंतरजातीय विवाह अन् धर्मांतर केले; वडिलांना चोरीची तक्रार केल्यानंतर झाली अटक

चिंचवड, दि. २९ (प्रतिनिधी) – पुण्यातील न्यायालयानं मंगळवारी एका १९ वर्षीय मुलीला जामीन मंजूर केला आहे. आंतरजातीय लग्न केल्यानंतर धर्मांतर केल्यानं नाराज होऊन वडिलांनी चोरीचा आरोप केला, असं तिनं कोर्टात सांगितलं. तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंगळवारी तिचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर न्यायालयानं तिला जामीन मंजूर केला.

मुलीच्या वडिलांनी सोमवारी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. चोरीचा आरोप केल्यानं पोलिसांनी तरुणीला अटक केली होती. तिच्यासोबत शिकणाऱ्या तरुणासोबत लग्न करण्याआधी तिनं घरातून दागिने आणि रोकड चोरली होती. त्यानंतर मुलीनं न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयानं तिची बाजू ऐकून घेतल्यानंतर जामीन मंजूर केला.

मुलीच्या म्हणण्यानुसार, कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिला. त्यानंतर २० जुलै रोजी तिनं घर सोडण्याचं ठरवलं. मुलीच्या वडिलांनी चिंचवड पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर २४ जुलै रोजी मुलगी आणि तरूण स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर पोलिसांनी तिच्या आई-वडिलांना बोलावून घेतले. मुलीनं लग्न केल्याचं आणि पतीसोबतच राहणार असल्याचं सांगितलं.

२६ जुलै रोजी मुलीच्या वडिलांनी मुलीवर चोरीचा आरोप केला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. २४ जुलैला मुलीला पोलीस ठाण्यात पाहिलं. मुलीच्या अंगावरील दागिन्यांपैकी काही दागिने हे घरातून चोरी केल्याचे त्यांनी सांगितले. घरी परतल्यानंतर मुलीनं ३.९५ लाख रुपये किंमतीचे दागिने आणि रोकड चोरल्याचे लक्षात आले, असे त्यांनी तक्रारीत म्हटले. वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करून सोमवारी तिला अटक केली. न्यायालयात तिला हजर केले असता, कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यानंतर मुलीनं जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली.

आंतरजातीय विवाह केल्यानंतर धर्मांतर केल्याच्या नाराजीतून वडिलांनी माझ्यावर चोरीचा खोटा आरोप केला, असं तिनं न्यायालयात सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं तिला जामीन मंजूर केला.

Share this to: