मातोश्री-२ साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किती रोख दिले?; काँग्रेस नेते संजय निरूपम यांची चौकशीची मागणी

मुंबई, दि. ९ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री-२ साठी ५ कोटी ८ लाख रुपये चेकने मोजले. मग रोख रक्कम किती दिली? असा सवाल काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी विचारला आहे. स्टर्लिंग बायोटेकसंदर्भात दिल्लीतील चौकशी संपली असेल, तर ईडीने मुंबईकडे मोर्चा वळवावा, अशा सूचनाही निरुपम यांनी केल्या आहेत.

स्टर्लिंग बायोटेकचे संचालक राजभूषण दीक्षित आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या मोठ्या मालमत्ता कराराची चौकशी केली, तर अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) मोठी माहिती मिळेल, असा दावा संजय निरुपम यांनी ट्विटरवरुन केला आहे.

मातोश्री-२ हे राजभूषण दीक्षित आणि त्यांच्या भावाकडून विकत घेण्यात आले आहे. त्याच दीक्षितांना १४ हजार कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यात संदेसरा फरार आहे. सीबीआयसुद्धा या घोटाळ्याची चौकशी करत आहे. असे निरुपम यांनी लिहिले आहे.

राजभूषण दीक्षित यांना मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबाने १० हजार चौरस फूट जागेवर असलेल्या मातोश्री-२ साठी केवळ ५ कोटी ८ लाख रुपये दिले. बीकेसीच्या दर्शनी भागात असलेल्या या मालमत्तेची खरी किंमत मुंबईतील प्रॉपर्टी तज्ज्ञांच्या मते यापेक्षा खूपच जास्त आहे. या जागेच्या प्रकरणात चेक पेमेंट करण्यापलीकडे मोठे रोख व्यवहार झाले आहेत, असा आरोपही निरुपम यांनी केला आहे.

हा करार राजभूषण दीक्षित आणि त्याच्या भावाने केली होती का? याची ईडीने चौकशी करावी. त्यासाठी मालमत्ता कराराची सखोल चौकशी आवश्यक आहे, असेही संजय निरुपम यांनी लिहिले आहे.

Share this to: