उद्धवजी पण गारद का?; आमचे राजकारण त्यांच्यासारखे नाही, ते घरात बसलेत – देवेंद्र फडणवीस

जळगाव, दि. ९ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली असून ‘एक शरद! सगळे गारद!!’ अशा मथळ्याखाली ती प्रसिद्द केली जाणार आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना सगळे म्हणजे उद्धवजी पण गारद का? असा टोला लगावला आहे. “सामना दुर्दैवाने केवळ सरकार सांभाळण्याचं काम करत आहे. सामना आधी शिवसेनेचं होतं पण आता तिन्ही पक्षाचं मुखपत्र आहे,” अशी टीकाही त्यांनी केली आहे.

जळगाव दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना टीका केली.

कोरोनाचा सामना करत असताना आम्हाला व्हायरसचा सामना करायचा आहे. लढा व्हायरसशी आहे नंबरशी नाही. सरकार सातत्याने नंबर कमी करण्यासाठी प्रयत्न करत असून ते चुकीचं आहे. टेस्टिंग आणि व्यवस्था वाढवली पाहिजे. महाराष्ट्रात टेस्टिंगची संख्या कमी आहे. कोरोनाला रोखण्यासाठी टेस्टिंग वाढवणं सर्वात महत्त्वाचं आहे.

पारनेरमधील राजकारणावरुन टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी, कोणत्या जगात ही मंडळी जगत आहेत हे माहिती नाही. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन कोरोनाचा सामना कसा करायचा याचा विचार केला पाहिजे. सरकारमध्ये विसंवाद असून महाराष्ट्राला याचा फटका बसत आहे अशी टीका केली.

सामनामधून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “सामना दुर्दैवाने केवळ सरकार सांभाळण्याचं काम करत आहे. सामना आधी शिवसेनेचं होतं पण आता तिन्ही पक्षांचं मुखपत्र आहे. दुर्दैवाने माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वात जी तत्वं पाळली, ज्या तत्वांचा विरोध केला आज त्यांचीच पाठराखण केली जात आहे.

सत्ताधारी घरी बसले आहेत, त्यांना लोकांची चिंता नाही. त्यांनी आमच्या दौऱ्यावर कीतीही टीका केली तरी लोकांना बरे वाटते की कुणी तरी आमची दु:ख पाहत आहे. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे राजकारण करीत नाही. आम्ही राजकारण जनतेकरीता करतो, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला हाणला.

Share this to: